
Pranav Birje | Senior Correspondent
नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवी कोरा, धमाल असलेला ‘बाई गं’ हा नवा चित्रपट येत्या १२ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ .आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे.
आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोड बदलणार आहे. एक अभिनेता आणि सोबत तब्बल ६ नायिका ही संकल्पनाच या सिनेमाची उत्सुकता वाढविणारी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.
दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू ठरणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असून यामध्ये तो वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा अफलातून अभिनेत्री ‘बाई गं’ चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सोबतच सागर कारंडे देखील विशेष भूमिकेत असणार आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. तर, गाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सामंत यांनी लिहीली आहेत. वरुण लिखते यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे.