Pranav Birje | Senior Correspondent

‘बाबू’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अंकित मोहनला गंभीर दुखापत
मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. आगरी- कोळी समाजातील भाषेचा झणझणीत जलवा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, चित्रपटात ‘बाबू’ची भूमिका साकारणारा अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी पारंपरिक पेहरावात नुकतेच आपल्या कोळी बांधवाना, भगिनींना भेटायला नवी मुंबईतील दिवाळे गावातील मासे मार्केटमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत निर्माते बाबू कृष्णा भोईरही होते. यावेळी चित्रपटातील टायटल साँगवर नृत्य करताना धारदार कोयता लागून अंकितच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अशातही तो नाचत होता, परंतु हातातून रक्त वाहू लागल्याने सगळे कोळी बांधव लगेच त्याच्या मदतीला धावून आले. गंभीर दुखापत असल्याने त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. अंकितच्या हाताला नऊ टाके पडले आहेत.
उपचारानंतरअंकित आपल्या कोळी बांधवाना भेटण्यास आणि त्यांचे आभार मानण्यास पुन्हा त्या मार्केटमध्ये गेला. या सगळ्यांचे प्रेम बघून अंकित भारावून गेला.
घटनेबद्दल अंकित म्हणतो, “कोळी बांधवांबद्दल मला आदर आहेच, परंतु आज त्यांच्यातील माणुसकी, आत्मीयता पाहून हा आदर अधिकच वाढला आहे. मला दुखापत झाल्यानंतर हे सगळे ज्या पद्धतीने माझ्या मदतीला आले, हे पाहून मी खूपच भारावलो. या सगळ्या गोंधळात आमची चर्चा अर्धीच राहिली आणि यांच्याकडून जाणून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणूनच उपचारानंतर मी या माझ्या बांधवाना भेटायला परत आलो. या निमित्ताने यांच्याप्रती असलेली कृतज्ञता मला व्यक्त करता आली. जशी आपुलकी त्यांनी या क्षणी माझ्याबद्दल दाखवली तसेच प्रेम ‘बाबू’वरही करा.”
श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.