Pranav Birje | Senior Correspondent
अभिनेता किरण गायकवाडची इच्छा झाली पूर्ण, लवकरच झळकणार कोकणी गीतात
देवमाणूस मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत हे लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गीतात एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर दर्याचं पाणी या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. अलिबागच्या नयनरम्य समुद्र किनारी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून श्रद्धा दळवी हिने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला अमेय मुळे यांनी संगीत दिलं आहे.
कोकणचा जावई म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड दर्याचं पाणी या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “माझी खूप आधीपासून इच्छा होती की एकदा तरी कोकणी गीतात काम करायचं. दिग्दर्शक विजय बुटे यांनी जेव्हा या गाण्याची संकल्पना माझ्याजवळ व्यक्त केली. तेव्हा मी फारच उत्सुक होतो. कोळी गेटअप मध्ये नाचताना खूप मज्जा आली. आणि समुद्र म्हणजे माझा आवडता विषय असल्या कारणाने, दिवसभर समुद्र किनारी बागडायला आणि शूटिंग करायला धम्माल आली. विशेष म्हणजे माझ्या कोळी लूकवर सोशल मीडियाद्वारे माझे फॅन्स छान छान कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे पाहून खूपच आनंद झाला.”