Pranav Birje | Senior Correspondent
रत्नागिरीच्या ऋषिराज धुंदूर याची मोठी झेप!
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या “संगीत मानापमान” या चित्रपटातून अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे रसिकांच्या भेटीला येत आहेत. १० जानेवारीपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रत्नागिरीचा अभिनेता ऋषिराज धुंदूर सहाय्यक भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाचे संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिले असून, दीपाली विचारे आणि सुभाष नकाशे यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. २०-२५ दिवसांच्या या चित्रपटाच्या कामकाजात ऋषिराजला दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची आणि सुबोध भावे यांचे मार्गदर्शन मिळण्याची संधी मिळाली. या अनुभवाबद्दल ऋषिराजने कृतज्ञता व्यक्त करत कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर आणि सुशील महादेव यांचे आभार मानले.

लहानपणापासूनच अभिनय, गायन, आणि नृत्याची आवड
ऋषिराज याची अभिनयाची सुरुवात जयगडच्या मा. वि. मंदिरातील स्नेहसंमेलनातून झाली. रमेश किर कला अकादमीच्या प्रदीप शिवगण आणि डॉ. शशांक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने एकांकिका, उत्सव नाटक, शॉर्ट फिल्म्स, आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. “कोकणातल्या झाकण्या” आणि “दिव्यांग १/२” या वेब सिरीजमधील त्याचे काम लक्षणीय ठरले.
कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहनाची गरज
ग्रामीण भागातील मुलांना कलाक्षेत्रात येण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच अभिनय, संगीत, आणि नृत्य या कलेची तोंडओळख व्हायला हवी, असे ऋषिराजने सांगितले. या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मेहनत आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.
सर्वांनी चित्रपट पाहण्याचे आवाहन
“संगीत मानापमान” १० जानेवारीपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या ऐतिहासिक चित्रपटाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ऋषिराज धुंदूर यांनी केले आहे.
